बाणेर परिसरातील ताम्हाणे चौकाजवळील वादग्रस्त जमिनीवर पहाटेच्या सुमारास अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी ११ ओळखीच्या व २५ ते ३० अनोळखी महिला व पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ओमकार संजय ताम्हाणे (२८, रा. बाणेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे,
की ताम्हाणे चौकाजवळील सुमारे एक एकर जागेच्या ताब्यावरून त्यांचे वडील संजय ताम्हाणे आणि प्रकाश धारीवाल यांच्यात न्यायालयीन वाद सुरू आहे. या प्रकरणात पुणे न्यायालयाने २५ मे २०२६ रोजी धारीवाल यांना संबंधित जागेत प्रवेश अथवा बांधकाम न करण्याचे आदेश दिल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. तक्रारीनुसार, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास २५ ते ३० महिला व पुरुष, त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या व शस्त्रे घेऊन जेसीबी, लोखंडी अँगल, पत्रे, सिमेंट आदी साहित्य घेऊन संबंधित जागेवर आले.
त्यांनी तेथे लोखंडी अँगल रोवून पत्र्याचे कंपाउंड उभारण्याचे काम सुरू केले होते. मात्र, ओमकार यांनी विरोध केला असता, उपस्थितांनी आपण धारीवाल, प्रशांत मांडेकर आणि मिलिंद कोठाडिया यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचे सांगितले. या वेळी तक्रारदार मोबाइलवर चित्रीकरण करत असताना आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यांचा भाऊ स्वराज ताम्हाणेही मारहाण केल्याने दोघे जखमी झाले असून, त्यांना बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी प्रकाश धारीवाल, प्रशांत मांडेकर, मिलिंद कोठाडिया, सुकेशनी बनसोडे, सुप्रिया पांचाळ, सना मोहम्मद शेख, कोमल शिंदे, जन्नम मोहम्मद शेख, उमा सुनील पवार, अर्चना ओव्हाळ, दीपा पिंटू विल्यम यांच्यासह २५ ते २० अनोळखी महिला-पुरुषांविरुद्ध बाणेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण माहिती बोलणार- धारीवाल
प्रकाश धारीवाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, याबाबत मला आत्ताच समजले आहे. कोणीतरी खोडसाळपणाने हे केले असेल. मला यातले काही माहिती नाही. याबाबत मी संपूर्ण माहिती घेत आहे. त्यानंतर सविस्तर बोलणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.