Pune
मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. “आरारारा खतरनाक…” म्हणत या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी सर्वांची मनं जिंकून घेतली होती.
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा जबरदस्त कमाई केली होती. ओम भूतकर, उपेंद्र लिमये, क्षितिश दाते, रमेश परदेशी, मोहन जोशी असे एकापेक्षा एक दमदार कलाकार या सिनेमात झळकले होते. या ब्लॉकबस्टर सिनेमाचा दुसरा भाग यावा अशी प्रेक्षकांची तसेच प्रवीण तरडेंच्या चाहत्यांची मनापासून इच्छा आहे. आता ‘मुळशी पॅटर्न’च्या दुसऱ्या भागाबाबत प्रवीण तरडेंनी एक महत्त्वाची अपडेट शेअर केली आहे.
प्रवीण तरडेंचा ‘देऊळ बंद २’ सिनेमा नुकताच २१ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सध्या जगभरात हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान प्रेक्षक पुन्हा एकदा ‘मुळशी पॅटर्न’चा दुसरा भाग केव्हा येणार याची विचारपूस प्रवीण तरडेंकडे करू लागले आहेत. याबाबत त्यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. तसेच ‘मुळशी पॅटर्न २’ची गोष्ट नेमकी काय असेल याची थोडक्यात हिंटही त्यांनी प्रेक्षकांना दिली आहे.
प्रवीण तरडे सांगतात, “आता ‘देऊळ बंद’च्या दुसऱ्या भागानंतर शक्यतो मी ‘मुळशी पॅटर्न’च्या दुसऱ्या भागाकडे वळेन. ‘मुळशी पॅटर्न’च्या मूळ भागातून म्हणजेच पहिल्या भागात मी सर्वांना… ‘शेती विकायची नसते, ती राखायची असते’ असं सांगितलं होतं. आता ‘मुळशी पॅटर्न २’मध्ये तुम्हाला हक्काच्या घराची गोष्ट पाहायला मिळेल. आपण जेव्हा मोठं घर बूक करतो…तेव्हा त्याचा हप्ताही मोठा असतो. तुमच्या-आमच्या हक्काच्या घराचं स्वप्न महाग का झालं? याचं उत्तर प्रेक्षकांना ‘मुळशी पॅटर्न २’मध्ये मिळणार आहे.”
“या दुसऱ्या भागाचं नाव ‘मुळशी पॅटर्न २ – तुमच्या घरच्या भिंतीतल्या वाळुची गोष्ट’! हे सिनेमाचं पूर्ण टायटल आहे. इतका खतरनाक सिनेमा…इतका खतरनाक की, अंगावर काटे, शहारे सगळं येईल. आता ‘देऊळ बंद २’नंतर एक मिटींग घेऊन मला या सिनेमावर काम सुरू करायचं आहे.” असं प्रवीण तरडेंनी सांगितलं.
त्यामुळे आता बहुप्रतीक्षित ‘मुळशी पॅटर्न २’ चित्रपटाचं शूटिंग केव्हा सुरू होणार आणि हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होईल याची सगळेजण आतुरतेने वाट पाहणार आहेत. याशिवाय ‘मुळशी पॅटर्न २’मध्ये ओम भूतकर पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार का? याबद्दलही चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.