आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune News : सुनेत्रा पवारांचा संदेश, तरीही बडे नेते ऐकेनात, अखेर सूत्रे फिरली अन् पार्थ

शरद लाटे  81   26-05-2026 11:35:51

Pune 

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाकडून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना राजीनामे देण्याचा निरोप देण्यात आला होता.

पण, 'उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष सांगितल्याशिवाय राजीनामा देणार नाही,' अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्यानं बैठकीत राडा झाला.

अखेर सायंकाळी अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे आणि उपाध्यक्ष मारूती जगताप यांनी आपले राजीनामे पक्षाचे नेते, खासदार पार्थ पवार यांच्याकडे सुपुर्द केला.

कात्रज दूध संघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक हाती सत्ता आहे. दरवर्षी एका तालुक्यातील संचालकाला अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी संधी द्यावी, असा निर्णय झाला आणि त्यानुसार त्याची आत्तापर्यंत अंमलबजावणी झाली होती. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपल्याने त्यांनी राजीनामा देण्याबाबत इच्छुकांकडून सतत मागणी करण्यात येत होती.

'नॉट रिचेबल' नगरसेवकांवरून वाद पेटला; वडेट्टीवारांच्या 'त्या' दाव्यावर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनीच…

गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कात्रज डेअरीच्या संचालकांची बैठक घेऊन कामकाजाचा घेतला होता. त्यावेळी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेत आला होता. सोमवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत पक्षाकडून अधिकृत निरोप दिला जाईल, असे सांगण्यात आले होते.

त्यापार्श्वभूमीवर पक्ष प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे आणि उपाध्यक्ष मारुती जगताप यांना राजीनाम्याबाबतचा संदेश दिला. बैठकीपूर्वीच संचालक अरुण चांभारे यांनी राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. पदाधिकाऱ्यांनी 'आम्हाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट काही सांगितलेले नाही,' अशी भूमिका घेत राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. यामुळे त्यावर एक-दोन संचालकवगळता जवळपास सर्व संचालक आक्रमक झाले. वातावरण तापल्याने बैठक अक्षरशः बारगळली. काही संचालकांनी सभेच्या नोंदवहीत सह्या केल्या, तर अनेक संचालक सह्या न करताच बैठकीतून बाहेर पडले.

पक्ष निरीक्षक वैशाली नागवडे यांनी फोनवरून पक्षाच्या निर्णयाची माहिती पुन्हा दिल्यानंतरही राजीनाम्याबाबत स्पष्टता न आल्याने संचालकांमध्ये नाराजी वाढली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशालाच डावलले जात असल्याची भावना काही संचालकांनी व्यक्त केली. या घडामोडींची माहिती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोच झाली.

यानंतर अध्यक्ष ढमढेरे आणि उपाध्यक्ष जगताप यांनी काही संचालकांना बोलावून आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यानंतर आणखी काही संचालकांनी सभेच्या रजिस्टरमध्ये सह्या केल्या. पण, बैठकीतील गोंधळ पूर्णपणे शांत झाला नव्हता. अखेरीस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी खासदार पार्थ पवार यांची भेट घेऊन आपले राजीनामे सुपुर्द केले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.