Pune
वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने अनेक रस्ते जलमय झाले आणि महामार्गासह शहरातील प्रमुख रस्ते वाहतूक कोंडीत अडकले. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतुक मंदावली तर सोसायट्यांसह दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
दुपारनंतर आकाशात काळे ढग भरून आल्यानंतर काळोख दाटला होता. त्यानंतर विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. रस्त्यांना ओढे-नाल्याचे स्वरूप आले. काही ठिकाणी गुडघारभर पाणी साचल्यामुळे वाहतुक मंदावली तर रस्ते निसरडे झाले.
पावसाला सुरवात होताच कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. पाऊस आणि वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी दुचाकीस्वारांनी उड्डाणपुलांखाली, बस थांब्यांवर आणि रस्त्याच्या कडेला आडोश्याला वाहने उभी केली. यामुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यांवर वाहनांच्या किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शहराच्या मध्यवर्ती भागास सेनापती बापट रोड, चांदणी चौक ते भुगाव रोड, पौड रोड, कर्वे रोड, डेक्कन, सातारा रोड, फातिमानगर, मुंढवा, चंदननगर, हडपसर, बंडगार्डन, बाणेर रोड, वाकड, हिंजवडी, बालेवाडी, सुस सह महामार्ग आणि सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे २० मिनिटाच्या अंतरासाठी तासभर वेळ गेल्याने नागरिकांची चीडचीड झाली. कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
खोदकामाने चिखल, अडथळा
शहरात ठिकठिकाणी महापालिकेकडून पावसाळापूर्व कामे तर खासगी कंपन्यांकडून केबल टाकण्याचे काम सुरू असून, ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. आज दुपारनंतर झालेल्या पावसामुळे खोदलेले खड्डे पाण्याने भरले.
सर्व माती रस्त्यावर आल्यामुळे रस्ता धोकादायक झाला. काही भागात रिमझिम पाऊस सुरू झाल्यावर रस्ते निसरडे झाले. परिणामी वाहने घसरून पडण्याच्या घटना घडल्या.
या खड्डयांमुळे वाहतुक कोंडीत आणखीन भर पडली. तर काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून, यामध्ये जिवीतहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहिती अग्निशामक दलाकडून दिली.