MPSC Typing Skill Test Cancelled: एमपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठीची 'टंकलेखन चाचणी' रद्द;
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गट-क (Group C) सेवा अंतर्गत येणाऱ्या लिपिक टंकलेखक (Clerk-Typist) आणि कर सहाय्यक (Tax Assistant) या संवर्गासाठी आयोगातर्फे घेतली जाणारी 'टंकलेखन कौशल्य चाचणी' (Typing Skill Test) पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
आयोगाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक बुधवारी (२० मे २०२६) प्रसिद्ध केले. या निर्णयामुळे आता परीक्षा प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार असून अंतिम निकालही अत्यंत कमी वेळेत जाहीर होण्यास मदत होणार आहे.
२४ एप्रिल २०२६ च्या बैठकीत मंजुरी
आयोगाच्या २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या २०५ व्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा नवा बदल बैठकीच्या दिनांकापासून म्हणजेच २४ एप्रिल २०२६ पासूनच तात्काळ अंमलात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी उमेदवारांकडे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असूनही आयोगाकडून पुन्हा स्वतंत्रपणे टंकलेखन चाचणी घेतली जात होती. म्हणजेच उमेदवारांची एक प्रकारे दोनदा परीक्षा होत होती. या दुहेरी प्रक्रियेमुळे अंतिम निकाल लागण्यास मोठा विलंब होत होता. हीच बाब लक्षात घेऊन आयोगाने कौशल्य चाचणी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
प्रमाणपत्रांची पडताळणी आता शासन स्तरावर
नव्या नियमानुसार, आता केवळ पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाईल. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी थेट शासनाकडे पाठवली जाईल. त्यानंतर संबंधित उमेदवारांच्या टंकलेखन प्रमाणपत्रांची मूळ खातरजमा आणि पडताळणी शासन स्तरावर केली जाणार आहे.
नव्या बदलानुसार अशी असेल निवड प्रक्रिया:
| टप्पा |
जुनी पद्धत |
नवीन पद्धत |
| १ |
पूर्व परीक्षा (Preliminary Exam) |
पूर्व परीक्षा (Preliminary Exam) |
| २ |
मुख्य परीक्षा (Mains Exam) |
मुख्य परीक्षा (Mains Exam) |
| ३ |
आयोगाची टंकलेखन कौशल्य चाचणी |
रद्द (थेट गुणवत्ता यादी) |
| ४ |
अंतिम निकाल व शिफारस |
मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे थेट शिफारस |