पुणे : कोकणातील प्रसिद्ध देवगड हापूस आंब्याला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असून, आंबा उत्पादन क्षेत्रात नवे प्रयोग सुरू झाले आहेत. पुण्यातील प्रगतशील आंबा बागायतदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची भेट घेत देवगड हापूस आंब्याची पेटी भेट दिली.
यावेळी त्यांनी कोकणातील आंबा उत्पादकांच्या विविध समस्या आणि मागण्या कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या.
राहुल शेवाळे यांनी तीन वर्षांपूर्वी कोकणावरील प्रेमातून देवगड येथे हापूस आंब्याची बाग खरेदी केली. बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनावर होत असलेला परिणाम लक्षात घेऊन त्यांनी AI आधारित तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांचा वापर सुरू केला आहे. यामुळे आंब्याची गुणवत्ता, उत्पादन व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न होत आहे.
आंब्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक स्कॅनिंग मशीनसाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली. सध्या या मशीनची किंमत ४० ते ५० लाख रुपये असल्याने सामान्य शेतकऱ्यांना ती खरेदी करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच देवगड हापूसमध्ये वाढत चाललेल्या ‘साका’ समस्येवर सखोल संशोधन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. आंबा उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास जागतिक बाजारपेठेत देवगड हापूसची गुणवत्ता आणि मागणी आणखी वाढू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल शेवाळे यांना दिल्लीमध्ये सविस्तर चर्चेसाठी निमंत्रित करत सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले.
यावेळी खासदार मेघाताई कुलकर्णी,सिद्धार्थ शेवाळे, सार्थक शेवाळे उपस्थित होते.
पारंपरिक कोकणी हापूस आणि आधुनिक AI टेक्नॉलॉजी यांची सांगड भविष्यात देवगड हापूसला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शेवाळे यांच्या मागणीला केंद्रीय कृषि मंत्र्यांनी देखील सकारत्मक भूमिका दाखवली आहे.