आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Manoj Jarange Patil : जरांगेंकडून पुन्हा आंदोलनाची हाक, 30 मे पासून करणार आमरण उपोषण

नितीन देशपांडे   350   16-05-2026 13:24:37

Pune 

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. 30 मे पासून जरांगे पुन्हा आंतरवाली सराटी येथे आंदोलन करणार आहेत. अंतरवाली सराटी येथे शनिवारी (ता. 16 मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जरांगेंनी या आंदोलनाची घोषणा केली आहे.

या आंदोलनाला 3 कोटींपेक्षा अधिक मराठे अंतरवाली सराटीत येतील, असे यावेळी जरांगेंकडून सांगण्यात आले. यावेळी जरांगेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार 308 का असेना नोंदी निघाल्या ना? अधिकारी सांगतात सरकारने आदेश दिले नाही, मग काय आमच्या पोरांचे वाटोळे झाल्यावर सरकार आदेश देणार का? असा सवाल मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण अडीच-तीन वर्षापासून लढत आहोत. समाजाच्या पदरात काय पडले? जून महिन्यात ऍडमिशन आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकार जळतंय, मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही ही सरकारची भूमिका आहे. सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही. आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांवर आरोप…

तसेच, आपल्याकडे रुपया नाही, पैशावाले आपल्यात येत नाहीत. मी प्रामाणिक आहे. आपल्याला वारंवार लढावे लागणार आहे. मुंबई तुम्ही विचाराने जिवंत केली. मुंबईतील लोक आम्हाला पुन्हा येणार का? म्हणून विचारतात. आता आंदोलन असे करायचे की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसले नाही पाहिजे. नुसते मराठेच दिसले पाहिजे. मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला पण तुम्ही का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केले आहे. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीसच जबाबदार आहेत. फडणवीसांनी विधानसभेत एक भाषण केले होते. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहे, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.

अंतरवाली सराटी येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक मराठा बांधव उपस्थित होते. त्यांच्यासमोर यावेळी जरांगेंनी उपोषणाची तारीख जाहीर केली, मनोज जरांगे पाटील 30 मे रोजी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली. 30 तारखेला सरकारला गुडघ्यावर आणणार. अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनासाठी 3 कोटी मराठे पुन्हा एकत्र येणार असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. परंतु, तुम्ही आमरण उपोषण करू नका, अशी विनंती उपस्थितांकडून करण्यात आली. मात्र, उपोषणाशिवाय पर्याय नाही, असे सांगत जरांगेंनी उपस्थितांची समजूत काढल्याचे पाहायला मिळाले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.