पुणे प्रतिनिधी : पानशेत धरणफुटीला ६५ वर्षे पूर्ण होत असताना अद्यापही अनेक पूरग्रस्त गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जागेचा मालकी हक्क मिळालेला नाही. पुणे शहरातील पानशेत पूरग्रस्तांच्या १०३ गृहनिर्माण संस्थांपैकी केवळ १२ संस्थांना जागेचा मालकी हक्क मिळाला असून उर्वरित ९४ संस्था अद्याप प्रतीक्षेत आहेत. या सर्व संस्थांना लवकरात लवकर मालकी हक्क मिळावा, अशी मागणी पुणे महापालिकेच्या नगरसेविका निवेदिता एकबोटे यांनी मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन केली आहे
पानशेत धरणफुटीनंतर पुणे शहरातील पूरबाधितांचे पुनर्वसन करण्यात आले होते. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी १०३ गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आल्या. या संस्थांना ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने जागा देण्यात आली होती. मात्र, अनेक दशकांनंतरही बहुतांश संस्थांना मालकी हक्क मिळालेला नाही.
यासंदर्भात नगरसेविका निवेदिता एकबोटे यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांना सविस्तर निवेदन सादर करत पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्काचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. विषयाची गांभीर्याने दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्काळ पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांसोबत व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक लवकरात लवकर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.