आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

'तुझा नवरा बाहेर गेलाय, आपण मज्जा करू'; पुण्यात रिक्षाचालकाकडून घरात घुसून महिलेसोबत जबरदस्ती,

Swati Jain   292   20-04-2026 10:06:53

Pune 

दुपारची वेळ…घरात ३७ वर्षीय महिला एकटीच…आणि अचानक दरवाजा ढकलून एक २८ वर्षीय रिक्षाचालक दरवाजासमोर जातो. सुरुवातीलाच तो अश्लील भाषेत बोलायला लागतो. 'तुझा नवरा बाहेर गेलाय…मी आत येतो, आपण मज्जा करू', हे ऐकून महिला हादरते…पण पुढे जे घडलं, ते आणखी धक्कादायक आहे.

पुण्यात नेमकं काय घडलं?

पुण्यातील सहकारनगर परिसरात ११ एप्रिल शनिवारी रोजी घडलेल्या या प्रकारानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमित संजय मोरे (वय २८, व्यवसाय रिक्षाचालक, रा. धनकवडी) असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, त्या दिवशी दुपारी त्या घरी एकट्याच असताना आरोपी थेट दाराजवळ आला. त्यावेळी त्याने अश्लील वाक्यं बोलत महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. महिलेने त्याला विरोध करत 'असं काहीही बोलू नकोस, मी तुझ्या आईसारखी आहे', असं ठणकावून सांगितलं. तरीही 'मला आत येउ दे, आपण मज्जा करू, काहीही होणार नाही', असं म्हणत आरोपीने महिलेला त्रास दिला.

मात्र, त्यानंतर महिला नकार देत होती म्हणून आरोपी आणखी आक्रमक झाला. 'मी आधी जेलमध्ये जाऊन आलो आहे. मला काही फरक पडत नाही. माझं कोणी वाकडं करू शकत नाही', असं म्हणत त्याने महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर 'तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस, तुझ्या नवऱ्याला बघून घेईल,' अशी थेट धमकीही दिली. या सगळ्या प्रकारामुळे महिला पूर्णपणे घाबरून गेली.

'महिला घरातसुद्धा सुरक्षित नाही का?'

घटनेनंतर महिलेनं तात्काळ सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. मात्र, अद्याप आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 'महिला घरातसुद्धा सुरक्षित नाही का?' असा सवाल आता स्थानिक महिलांकडून विचारला जातोय. पोलिसांकडून आरोपीला लवकर अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून पुढील तपास सुरू आहे.

महत्त्वाचं म्हणजे, अशा प्रकारच्या घटना समोर आल्यास घाबरून न जाता त्वरित पोलिसांत तक्रार द्यावी, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला जाईल. मात्र, शहरातील वाढती गुन्हेगारी, अत्याचार करणाऱ्यांची हिम्मत आता प्रशासन यंत्रणेपुढे देखील कमी वाटायला लागली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा तरी धाक उरलाय का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होतोय.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.