आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

आदित्य ठाकरे होणार शिवसेनेचे कार्याध्यक्ष? हालचाली सुरू

नितीन देशपांडे   182   15-04-2026 12:04:38

Pune 

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाचे युवा नेतृत्व आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच पक्षाची सर्वोच्च जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या (UBT) कार्याध्यक्षपदी निवड केली जाऊ शकते. हा निर्णय झाल्यास ठाकरे गटाची धूरा संपूर्णपणे आदित्य ठाकरेंच्या हाती जाऊ शकते. तसेच पक्षातील सर्व निर्णयांचा अधिकार आदित्य ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. यामुळे आदित्य ठाकरे याचं पक्षातील वजन आणि अधिकार दोन्ही वाढण्याची शक्यता आहे.

19 जून रोजी होणार अधिकृत घोषणा?

येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. याच मुहूर्तावर आदित्य ठाकरेंच्या पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी लवकरच पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली जाऊ शकते. या बैठकीत रितसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाईल. 2010 मध्ये युवासेनेच्या स्थापनेपासून आदित्य ठाकरे संघटनेत सक्रिय आहेत, मात्र 'कार्याध्यक्ष' पद हे त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठे वळण ठरू शकते.

2003 च्या इतिहासाची पुनरावृत्ती

ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांच्या मते, ही प्रक्रिया 2003 साली महाबळेश्वर येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीसारखीच असेल. त्यावेळी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती, अगदी त्याच धर्तीवर आता आदित्य ठाकरेंकडे सूत्रे सोपवण्याचा विचार सुरू आहे. उद्धव ठाकरेंकडून पक्षाची धुरा हळूहळू पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

नेत्यांचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा

गेल्या काही वर्षांत संघटनात्मक बांधणीपासून ते निवडणुकांच्या रणनीतीपर्यंत आदित्य ठाकरेंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्षात तरुणांची नवी फळी निर्माण होईल, असा विश्वास नेत्यांना वाटत आहे. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि राजकारणात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आदित्य ठाकरेंना अधिकार देणे आवश्यक असल्याचा एक मोठा मतप्रवाह ठाकरे गटात आहे.

संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया

या चर्चेवर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे सुद्धा काळानुसार पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. जर आदित्य ठाकरेंचे नाव समोर येत असेल, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. आताच्या काळात तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट काम केले आहे", अशा शब्दांता त्यांनी आदित्या ठाकरेंच्या कार्यशैलीचंही कौतुक केलं


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.