Pune pcmc
सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच MHADA खूप महत्त्वाची भूमिका बजावते. म्हाडाच्या माध्यमातून राज्यातील महत्वाच्या शहरात स्वस्तात खरे खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न पूण झालं आहे.
पारदर्शक लॉटरी प्रक्रिया आणि परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध होत असल्याने अनेकजण आतुरतेने म्हाडा लॉटरीची वाट पाहत असतात. आता तुम्हीही नव्या वर्षात नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी म्हाडाकडून एक खुशखबर आहे. कारण आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये म्हाडाकडून तब्बल १३,०१२ घरे बांधण्यात येणार आहेत.
मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या आपल्या प्रादेशिक मंडळांच्या कार्यक्षेत्रात ही घरे बांधण्यात येणार आहेत. म्हाडाचा आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचा सुधारित अर्थसंकल्प आणि वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प नुकताच प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला होता. प्राधिकरणाच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीच्या १२,३९९ कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पाला आणि वर्ष २०२६-२७ साठीच्या १७,४३०.७३ कोटींच्या अर्थसंकल्पाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे, असे म्हाडाने एका निवेदनात म्हटले आहे. Mhada Lottary 2026
म्हाडाच्या माहितीनुसार, मुंबईमध्ये विविध उत्पन्न गटांसाठी २,५३८ घरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बांधकामावरील खर्चासाठी ६,७४७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोकण विभागात म्हाडाने ५,११२ सदनिका बांधण्याची योजना आखली असून, त्यासाठी १,४९७ कोटींची तरतूद बाजूला ठेवण्यात आली आहे. पुणे शहरात ६६५ सदनिका बांधण्यात येणार असून, त्यासाठी ६६४ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर नागपूरमध्ये २,००८ सदनिका बांधण्याचे नियोजन असून, त्यासाठी १,२०६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. Mhada Lottary 2026
छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी १,४८३ घरे बांधण्याची म्हाडाची योजना असून, त्यासाठी २५८ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. नाशिकसाठी २३७ घरे बांधण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी १५१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अमरावतीमध्ये ९६९ घरे बांधण्यासाठी म्हाडाकडून ५९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडाच्या माहितीनुसार, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाद्वारे आमदार निधी किंवा सरकारी निधीचा वापर करून हाती घेतल्या जाणाऱ्या कामांसाठी २,७११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यानंतर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांतर्गत येणाऱ्या ‘सेस’ (cessed) इमारतींच्या दुरुस्तीसाठी ६६१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.