Pune
पुणे महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे निवृत्त होऊनही बांधकाम विकास विभागावर त्यांचेच वर्चस्व असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वाघमारे यांच्या अत्यंत मर्जीतील काही ठराविक अधिकारी तांत्रिक गुणवत्ता नसतानाही वर्षानुवर्षे याच विभागात ठाण मांडून बसले असून, महापालिका प्रशासनापेक्षा 'खाजगी' हितालाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. या 'संघटित टोळी'ने हजारो कोटींच्या टीडीआर आणि चुकीच्या बांधकाम परवान्यांच्या माध्यमातून पुण्याचा चेहरा विद्रुप केल्याचा आरोप करत, या सर्व अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे.
सामान्य प्रशासन विभाग आणि नगर विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकाच विभागात ठराविक वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. मात्र, वाघमारे यांच्या कार्यकाळापासून कार्यकारी अभियंता जयवंत पवार, कार्यकारी अभियंता सुरेश साखळे, कनिष्ठ अभियंता तथा तांत्रिक पीए संजय शिंदे, अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे आणि संदीप चाबुकस्वार यांसारख्या अधिकाऱ्यांनी या नियमाला हरताळ फासला आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक अधिकारी केवळ 'डिप्लोमा' धारक असूनही, जेष्ठता डावलून आणि मुख्य सभेची मान्यता न घेता त्यांना नियमबाह्य पदोन्नती देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अधिकारी की खासगी एजंट?
तक्रारीनुसार, या अधिकाऱ्यांचे कारनामे थक्क करणारे आहेत. जयवंत पवार: कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता असा संपूर्ण प्रवास केवळ बांधकाम विभागातच. पदवी नसतानाही विशेष अधिकारात पदोन्नती.
साखळे दांपत्य: सुरेश साखळे आणि त्यांच्या पत्नी गेली १०-१२ वर्षे नियमबाह्यरीत्या याच विभागात कार्यरत आहेत. मूळ नियुक्ती इतर विभागात असूनही केवळ आर्थिक बळावर बांधकाम विभागात 'सेट' असल्याचा आरोप.
संजय शिंदे: २०१७ मध्ये नियुक्त झालेले शिंदे हे अवघ्या काही काळातच वाघमारेंचे तांत्रिक सहाय्यक झाले. बदली होऊनही तीन वर्षांपासून पद सोडण्यास तयार नाहीत.
संदीप चाबुकस्वार:वाघमारे यांच्या मुलाच्या लग्नासारख्या खाजगी कामांसाठी एक-एक महिना सरकारी कर्तव्याऐवजी खाजगी जबाबदाऱ्या सांभाळल्याचा खळबळजनक आरोप.
टीडीआर आणि बेनामी संपत्तीचा विळखा
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रशांत वाघमारे यांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी सुरू झाली आहे. मात्र, हा घोटाळा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून, ही एक पूर्ण यंत्रणा आहे. या टोळीने बांधकाम व्यावसायिकांशी हातमिळवणी करून बेकायदेशीर परवाने दिले आणि त्यातून प्रचंड बेनामी संपत्ती गोळा केली आहे. यामुळे शहराच्या नियोजनाची पूर्णतः वाताहत झाली असून, प्रामाणिक आणि जेष्ठ अभियंत्यांना डावलले जात असल्याने महापालिकेत संतापाचे वातावरण आहे.
महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या आणि शहराचे नियोजन धुळीस मिळवणाऱ्या या 'पिलावळी'ची आता आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे, तरच पुणेकरांना न्याय मिळेल.
- कल्पेश यादव, युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव
आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडून अपेक्षा
पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची प्रतिमा एक स्वच्छ आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून आहे. तरीही त्यांच्या नाकाखाली हा 'रिमोट कंट्रोल' कारभार कसा चालतोय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. "प्रशांत वाघमारे यांच्या मर्जीतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली कधी? त्यांची चौकशी कधी होणार?" असा थेट सवाल आता प्रशासनाला विचारला जात आह