Pune खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जातात. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आज पुण्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेत जवळपास एक तास प्रदीर्घ चर्चा केली. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या कार्यक्रमात चव्हाण नियोजित वेळेपूर्वी पोहोचले होते, त्यावेळीच ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात झालेल्या या बंद दरवाजाआड बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या दिलीप मोहिते पाटील यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसोबत इतकी सविस्तर चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय जगताप यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत आगामी निवडणुका, खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे आणि पुढील रणनीती यावर चर्चा झाल्याचं समजतंय.
दरम्यान, या घडामोडींमुळे दिलीप मोहिते पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच जोर मिळाला असून, अजित पवार गटासाठी ही मोठी राजकीय धक्का ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीवेळीच दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पक्ष निर्णयात विश्वासात घेतलं जात नसल्यानं आमदार दिलीप मोहिते पाटील नाराज होते.