आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर,

नितीन देशपांडे   665   04-04-2026 15:49:11

पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर,

Pune 

पावसाने गुरुवारी पुणे शहर अक्षरशः तुंबले, रस्ते पाण्याखाली गेले. घरांत, दुकानात पाणी शिरले आणि एका ज्येष्ठ महिलेचा बळी गेला. त्यामुळे महापालिकेचे नियोजन कोलमडल्याचे चित्र समोर (Pune Rain Flooding) आले.

त्यानंतर आज (ता. ३) पुणे महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागासह अन्य विभागांची तातडीची बैठक घेण्यात आली. कामात सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला कंबर कसण्याचे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले आहेत. पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून (ता. ६) कामे सुरू केली जाणार आहेत.

धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्यासाठी ४८ तासांच्या आत परवानगी द्या, प्रशासनाने स्वतःहूनही यात पुढाकार घ्यावा, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, महापौरांनी दिरंगाईबाबत प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. गुरुवारी (ता. २) दुपारी पावसाने शहराला झोडपून काढले. सिंहगड रस्ता, कोथरूड, वारजे, कर्वेनगर, कोंढवा, कात्रज, पेठांसह सर्वच भागातील नाले तुडुंब भरले, रस्ते पाण्याखाली बुडाले, अनेक ठिकाणी कंबरेपर्यंत पाणी तुंबले होते.

अनेक दुकाने व सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले. यात महापालिकेची कुठेही यंत्रणा नसल्याने त्यावर नागरिकांनी टीकेची झोड उठवली. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आपत्कालीन बैठकीत महापौर नागपुरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता दिनकर गोजारे, उपायुक्त माधव जगताप आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत महापौर आणि आयुक्तांनी माहिती दिली. महापौर नागपुरे म्हणाल्या, ''पुण्यास सलग दोन दिवस मोठा पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी मी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. कमी कालावधीमध्ये मोठा पाऊस झाल्याने पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी यापूर्वीही आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन जूनपूर्वी यंत्रणा सज्ज करण्याचे, नाले सफाईचे आदेश दिले होते.

मात्र, हा पाऊस अचानक आल्याने स्थिती गंभीर झाली होती. शहरात २६० ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यापैकी २२७ ठिकाणे धोकादायक असून, त्यातील १२० ठिकाणी जूनपूर्वी कामे केले जातील. त्यामुळे त्या भागात पाणी तुंबणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसेच ओढे-नाल्यांच्या कडेला उभी राहिलेली अनधिकृत बांधकामे असून, त्यावरही कारवाईचे आदेश दिले आहेत.'' धोकादायक झाडे काढणे, फांद्या छाटण्याचे काम केवळ पावसाळ्यापूर्वी केली जातात. पण ही कामे वर्षभर करणे आवश्‍यक आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी मनुष्यबळ व निधी दिला जाणार आहे. झाडे पडून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रशासन पारंपारिक पद्धतीने गेले अनेक वर्ष काम करत आहे पण त्यांनी आता पावसाच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून, कार्यपद्धती बदलणे आवश्‍यक आहे. तरच नागरिकांना दिलासा देता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने धोरण तयार करावे, असे आदेश दिले आहेत.''

-मंजूषा नागपुरे, महापौर


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.