आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

NCP पटेल-तटकरेंचं पद गायब, NCPतून पत्ता कट होणार?

शरद लाटे  52   02-04-2026 10:50:38

Pune 

अजित पवार यांचं निधन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आलं.

त्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोरील पदनामं गायब होती. हे पत्र समोर येताच राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. याबाबत आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.

सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांचा वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांना राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणे सर्व अधिकार द्यावेत, अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून संबंधित पत्र रद्दबातल ठरवावं, असं सांगितलं होतं. या प्रकारानंतर आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या नावासमोर पदनाम गायब आहेत.

यावर आता सुनील तटकरेंच्या कन्या आणि मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीकडून लिहिलेल्या पत्रात पदनाम गायब असण्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ज्यादिवशी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्याच दिवशी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या देखील नेमणुका झाल्या. सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा विस्तार करण्याचे काम करू, असं आदिती तटकरे म्हणाल्या. त्या कर्जत येथे पत्रकारांशी बोलत होत्या.

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?


कर्जत येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. क्रिकेट सामन्याचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी मैदानात एक षटकार लगावला. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहाच्या सहा जिंकल्या यावर त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव न घेता त्यांना उपरोधिक टोला लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत षटकार लगावला आता अजून कुठला षटकार मारायचा राहिला आहे, असं मला वाटत नाही, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख नसल्याबाबत विचारलं असं आदिती तटकरे म्हणाल्या, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेमणुका झाल्या आहेत. ज्यावेळी सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. त्याच दिवशी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेमणुका झाल्या. सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा विस्तार करण्याचे काम करू, असं त्या म्हणाल्या.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.