आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune News रस्ते रुंदीकरण आता प्रत्यक्षात; 'जोते तपासणी'पूर्वी बाधित जागा पालिकेच्या ताब्यात देणे बंधनकारक!

Swati Jain   120   30-03-2026 14:15:58

Pune 

रस्ता रुंदीने बाधित होणारे क्षेत्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही महापालिकेच्या ताब्यात देण्यास बांधकाम व्यावसायिकांकडून टाळाटाळ होते. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कागदावरच वाढते.

प्रत्यक्षात रस्ते अरुंद राहून वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होतात. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

रस्ता रुंदीने बाधित होणाऱ्या क्षेत्राचा ताबा 'जोते तपासणी'पूर्वी महापालिकेकडे देणे विकासकांना बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे कागदावरच रुंद असलेल्या रस्त्यांचे प्रत्यक्षात जागेवर रुंदीकरण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जागामालक अथवा भूखंडधारक वास्तूविशारदामार्फत बांधकाम नकाशे मंजुरी करण्यासाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करतात. बांधकाम विकास विभागाकडून त्या प्रस्तावांना मंजूर एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (यूडीसीपीआर) बांधकाम परवानगी देते.

काही बांधकाम परवानगीच्या प्रस्तावात विकास योजनेनुसार रस्ता रुंदीने बाधित क्षेत्र दर्शविले जातात. त्यानुसार सदर क्षेत्राची वजावट करून बांधकाम परवानगीचे प्रस्ताव मंजूर केले जातात. वास्तविक बाधित होणारे रस्त्याचे क्षेत्र बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर लवकरात लवकर महापालिकेच्या ताब्यात देणे गरजेचे असते. परंतु, बऱ्याचप्रकरणी इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत बाधित होणारे रस्त्याचे क्षेत्र ताब्यात दिले जात नाही.

त्यामुळे अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना सलग पूर्ण रुंदीचा रस्ता उपलब्ध होत नाही. अशा स्वरूपाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पालिकेकडे आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी बाधित रस्त्याचे क्षेत्र तातडीने महापालिकेच्या ताब्यात देणे व्यावसायिकांना बंधनकारक केले असून, असे क्षेत्र ताब्यात दिले नाही, तर संबंधित व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

समस्या काय?

विकास योजनेनुसार अनेक ठिकाणी रस्ते रुंदीकरणासाठी जागा आरक्षित असते.

बांधकाम परवानगी देताना त्या बाधित क्षेत्राची वजावट करून नकाशे मंजूर होतात.

प्रत्यक्षात विकासकांकडून हे क्षेत्र महापालिकेला वेळेवर दिले जात नाही.

परिणामी रस्ते कागदावर रुंद, पण प्रत्यक्षात अरुंदच राहतात.

शहरात वाहतूक कोंडी आणि अपुरी रस्ते सुविधा ही मोठी समस्या बनते.

निर्णयामुळे बदल काय होणार?

रस्ते प्रत्यक्षात रुंद होण्यास गती मिळणार.

वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.

नागरिकांना सलग आणि पूर्ण रुंदीचे रस्ते उपलब्ध होणार.

कुठे जास्त परिणाम?

शहरातील नव्याने विकसित होणारे भाग

विकास योजनेतील असलेले क्षेत्र

बांधकाम सुरू असलेले प्रकल्प


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.