Pune Sangali IAS transfer: राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. मैनक घोष यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. घोष हे सध्या धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत.
सांगली पॅटर्न थांबला
सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे हे अनुभवी व जेष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, आता त्यांची बदली मुंबई येथे कृषी औद्योगिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी करण्यात आली आहे, अशोक काकडे हे लोकाभिमुख अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते, त्यांनी सांगली पॅटर्न अभियानांतर्गत अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले, त्यामध्ये दिव्यांग कल्याण, कामगार कल्याण, शिक्षण, आरोग्य व इतर सामाजिक जाणिवा ठेवून शासकीय संवेदनशीलता जागृत ठेवली होती, ज्यातून सांगली जिल्ह्यात लोकप्रिय झाले होते; मात्र अचानक झालेल्या बदलीने सामन्यांमध्ये चर्चा होत आहे, मात्र ही प्रशासकीय बदली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कर्तव्यदक्षतेचा आदर्श
डॉ. मैनक घोष हे २०१९ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी असून ते मूळचे पश्चिम बंगालचे आहेत . त्यांची ओळख एक अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आहे. गतवर्षी धाराशिव जिल्ह्यात महापूर आला असताना, डॉ. घोष यांनी आपल्या कामातून प्रशासकीय अधिकाऱ्याचा खरा आदर्श घालून दिला होता. आपल्या वडिलांच्या निधनानंतर, त्यांच्यावर अंत्यसंस्कार उरकून डॉ. घोष दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले होते]. त्यांच्या या समर्पित वृत्तीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते.
धाराशिवलाही मिळाल्या नव्या सीईओ
दरम्यान, डॉ. मैनक घोष यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडळदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंवदा या मूळच्या रत्नागिरीच्या असून त्या २०२२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत महाराष्ट्रातून १३ वा क्रमांक मिळवला होता. सांगली जिल्ह्याच्या विकासाची आणि प्रशासनाची धुरा आता डॉ. मैनक घोष यांच्यासारख्या अनुभवी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या अधिकाऱ्याच्या हातात आली आहे.