आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 चंद्रपूर

PCMC | स्थायी समितीच्या प्री-मीटिंगमध्ये 'पतीराज'च बनले कारभारी

शिंदे राम   71   26-03-2026 14:38:30

Pune 

महापालिकेच्या स्थायी समितीच्या प्री-मीटिंगमध्ये बुधवारी (दि.२५) घडलेला प्रकार हा केवळ वादाचा प्रसंग नसून, महापालिकेतील कारभार नेमका कोण चालवतो, यावरच मोठा प्रश्न उपस्थित करणारा ठरला.

निवडून आलेल्या नगरसेविका बाजूला आणि त्यांच्या पतींचाच बैठकीत वावर यामुळे 'स्थायीत पतीराज?' अशी चर्चा रंगली आहे.

सभापतींच्या कार्यालयात अधिकृत सभेआधी होणाऱ्या या प्री-मीटिंगमध्ये काही नगरसेविकांच्या पतींचीच उपस्थिती आणि हस्तक्षेप ठळकपणे दिसून आला. कोणत्याही अधिकृत पदावर नसलेल्या व्यक्ती थेट टेंडरच्या मुद्द्यावर भूमिका मांडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे निर्णयप्रक्रियेची पारदर्शकता आणि वैधता दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

निगडीतील स्विमिंग टँकच्या टेंडरवरून वादाची ठिणगी पडली. एका नगरसेविकेच्या पतीने संबंधित ठेकेदाराला काम देऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्या ठेकेदाराच्या पूर्वीच्या कामात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत, त्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी पुढे केला.

मात्र, दुसऱ्या बाजूला जेष्ठ नगरसेविकेकडून हा विषय मंजूर करण्याचा ठाम आग्रह धरण्यात आला. यानंतर वादाने चांगलाच पेट घेतला. "तुम्ही या बैठकीत कसे?" असा थेट सवाल उपस्थित होताच, बैठकीत पतींची उपस्थिती हा मुख्य मुद्दा बनला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, आवाज चढले आणि वाद वैयक्तिक पातळीवर पोहोचला.

परिस्थिती इतकी बिघडली की संतप्त झालेल्या संबंधित व्यक्तीने बैठक अर्धवट सोडून बाहेर पडणेच पसंत केले. अधिकृत सभा सुरू होण्याआधीच असा गदारोळ झाल्याने सत्ताधाऱ्यांमधील विसंवादही उघड झाला.

मात्र, या सगळ्या प्रकारात सर्वात गंभीर बाब म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या जागी त्यांच्या पतींचा वाढता हस्तक्षेप. 'प्रॉक्सी कारभार' उघडपणे सुरू असल्याचे चित्र यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे. अधिकृत पद नसताना निर्णयप्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या या 'अनधिकृत कारभाऱ्यां'वर कोण नियंत्रण ठेवणार, हा सवाल उपस्थित होत आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.