Pune
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 'स्पा आणि वेलनेस सेंटर्स'च्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापार आणि मानवी तस्करीचा मुद्दा बुधवारी (दि. १८) विधान परिषदेत आला. आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याकडे लक्ष वेधले.
स्पा व्यवसायासाठी तीन महिन्यांत स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.
आमदार गोरखे म्हणाले, शहरात शिक्षणासाठी येणारी तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत बरबाद होत आहे. हे केवळ स्पा नसून अंमली पदार्थ आणि मानव तस्करीचे अड्डे बनले आहेत. पोलिस कारवाई करतात, पण दोन दिवसांत तेच मालक नव्या नावाने सेंटर सुरू करतात.
गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती तयार केली आहे. नगरविकास आणि ग्रामविकास विभागाचा अहवाल लवकरच सादर होईल. पुढील तीन महिन्यांत नवीन नियमावली लागू केली जाईल.
नायडू, पटेल, शेख, फकीर टोळी
पिंपरी-चिंचवडमधील नायडू, पटेल, शेख, फकीर, अधिकारी, बांदोडकर अशा अनेक ठराविक लोकांची संघटित साखळी हा काळा बाजार चालवत आहेत. केवळ कर्मचाऱ्यांवर गुन्हे न नोंदवता, या मास्टरमाइंड्सच्या मालमत्तांची चौकशी करून त्यांच्यावर 'मकोका'अंतर्गत कठोर कारवाई करावी, स्वतंत्र नियमावलीची मागणीदेखील आमदार गोरखे यांनी केली.