आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली गुड न्यूज

शरद लाटे  147   13-03-2026 20:34:02

Pune 

युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे भारतातही गॅस टंचाई निर्माण झाली आहे.

या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने आता LPG ची अतिरिक्त खेप अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि रशिया यांसारख्या नवीन देशांकडून मागवत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच खाडी प्रदेशातून जिथे पुरवठा उपलब्ध आहे, तिथूनही खरेदी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे भारतातील LPG सिलिंडरची चिंता लवकरच मिटण्याची शक्यता आहे.

 

भारतात अनेक ठिकाणी एलपीजी सिलिंडरची कमतरता जाणवत आहे. यावर बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले की, ‘जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा LPG आयातदार असल्यामुळे भारत सध्या मर्यादित पुरवठ्याच्या आव्हानाला सामोरे जात आहे. केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना सल्ला दिला आहे की हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राला एका महिन्यासाठी बायोमास, केरोसिन आणि कोळसा यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून LPG चा वापर कमी करता येईल.’

 

भारत आखाती देशांमधून 60% गॅस आयात करायचा

 

हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत सांगितले की, पूर्वी भारत आपल्या LPG गरजेपैकी सुमारे 60% आयात आखाती देशांमधून करत होता, मात्र आता खरेदीचे स्रोत वाढवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर करून रिफायनरींना LPG उत्पादन वाढवण्याचे आणि उद्योगांना विक्री कमी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे देशातील सुमारे 33.3 कोटी घरांना गॅसची कमतरता भासणार नाही.’ पुढे बोलताना पुरी म्हणाले की, ‘घरगुती LPG पुरवठा पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. मात्र ग्राहकांच्या मनात गॅस मिळणार नाही याबाबत भीती निर्माण झाल्याचे दिसत आहे.’

 

जगभरात तेलाची कमतरता

 

अमेरिका आणि इस्रायल सतत इराणवर हल्ले करत आहेत. यामुळे आखाती देशांचा प्रदेश आणि स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जहाजांची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. याचा परिणाम भारताच्या कच्चे तेल, LPG आणि LNG पुरवठ्यावरही झाला आहे. सरकारच्या उपाययोजनांनंतरही रेस्टॉरंट, हॉटेल आणि अनेक उद्योगांना LPG च्या मर्यादित पुरवठ्याचा परिणाम जाणवू लागला आहे, मात्र आता भारत सरकारने यावर उपाय शोधला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.