आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

अजितदादांचं नाव वापरण्यासाठी कुटुंबियांची परवानगी बंधनकारक, आयुक्तांनी काढले फर्मान

शरद लाटे  34   11-03-2026 10:34:53

Pune 

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं 28 जानेवारी 2026 बारामती विमानतळावर झालेल्या दुर्घटनेत निधन झालं. यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. आता अजितदादांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशानं कुठेही त्यांचं स्मारक उभारणे, उपक्रम, योजनेसह काही नवीन उपक्रम राबवताना या पुढील काळात त्यांच्या कुटुंबियांची लेखी परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

उपमुख्य़मंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे याबाबत पत्र दिलेले आहेत. या पत्रात आयुक्तांनी हे पत्र राज्यातील सर्वच कार्यालयांना कळविण्यात यावे व त्याची प्रत नोटीस बोर्डावर लावावी, असे निर्देश दिलेले आहेत.

सुनीलकुमार मुसळे या पत्रात म्हणतात, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. दादांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान उत्तुंग असून, त्यांच्याप्रती जनमानसात मोठी आदराची भावना आहे.

या पार्श्वभूमीवर, येणाऱ्या काळात दादांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने विविध शहरांमध्ये त्यांचे पुतळे उभारणे, 'सृष्टी' किंवा स्मारके निर्माण करणे, तसेच त्यांच्या नावाने नवीन शैक्षणिक, सामाजिक संस्था किंवा चॅरिटेबल ट्रस्ट (न्यास) नोंदणी करण्याची शक्यता आहे.

अशा उपक्रमांमागे अनेकदा शुद्ध भावना असते, तरीही काही ठिकाणी व्यावसायिक किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा चुकीचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजितदादांची प्रतिष्ठा, त्यांच्या कार्याचे पावित्र्य आणि जनमानसातील त्यांची प्रतिमा जपली जावी, याकरिता आम्ही आपणास खालील विनंती करत आहोत.

1. कुटुंबियांची पूर्वपरवानगी: स्व.अजितदादा पवार यांच्या नावाने कोणत्याही नवीन संस्थेची, ट्रस्टची किंवा फाऊंडेशनची नोंदणी करताना त्यांच्या कुटुंबीयांची लेखी 'ना हरकत प्रमाणपत्र' घेणे अनिवार्य करण्यात यावे.

 

2. पुतळे व स्मारके उभारणी : सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे व सर्वोच्च न्यायालयाचे जे कडक निकष (उदा. वाहतुकीस अडथळा नसावा, जागा मालकी हक्क इ.) आहेत, त्यांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. शासनाच्या परवानगीशिवाय व कुटुंबियांच्या संमतीशिवाय असे पुतळे उभारले जाऊ नयेत.

 

3. स्मारक व पुतळे : सार्वजनिक ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा स्मारके उभारण्यासाठी नोंदणी होणाऱ्या समित्यांच्या बाबतीतही कडक नियमावली असावी, जेणेकरून त्या माध्यमातून भविष्यात कोणतेही वाद निर्माण होणार नाहीत.

 

4. नावाचा गैरवापर रोखणे : अजितदादांच्या नावाचा वापर करून अनधिकृतपणे निधी गोळा करणे किंवा संशयास्पद कारभार करणाऱ्या संस्थांच्या अर्जाची सखोल चौकशी व्हावी.

 

5. अधिकृतता तपासणे : ज्या संस्था आधीच अस्तित्वात आहेत आणि आता नाव बदलून दादांचे नाव लावू इच्छितात, त्यांच्यावरही वरील नियम लागू करावा.

 

सुनीलकुमार मुसळे यांनी या पत्रात धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व जिल्हा व विभाग कार्यालयांना यासंदर्भात त्वरित निर्देश द्यावेत, अशी विनंती केले होती. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी हे निर्देश जारी केले आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.