आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

भाजपा आमदाराशी संबंधित कंपनीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनच मिळेना, कामबंदचा इशारा!

नितीन देशपांडे   196   09-03-2026 17:01:37

Pune 

भाजप आमदाराशी संबंधित कंपनीने नागपुरातील महावितरणच्या विविध उपकेंद्रावर काम करणाऱ्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यापासून वेतन थकवल्याची धक्कादायक माहिती आहे.

होळीच्या सनातही या कामगारांचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून त्यांनी थेट महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देत कामबंदचा इशारा दिला आहे.

कंत्राटी- बाह्यस्त्रोत कामगार संघटनेचे आरोप काय?

सत्ताधारी पक्षातील आमदाराशी संबंधित कंपनीवर वीज उद्योगातील कंत्राटी- बाह्यस्त्रोत कामगार संघटनेकडून गंभीर आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.महावितरण कंपनीच्या नागपूर ग्रामीण परिमंडळातील सावनेर विभागासह विदर्भातील सुमारे ३२९ वीज उपकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट 'क्रिस्टल' कंपनीकडे आहे. या कंपनीकडून कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकवले गेल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. ही कंपनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची असून त्यावर त्यांचे कुटुंबिय संचालक असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने मिळून मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन छेडल्याचा इशाराही त्यांनी महावितरणला दिला आहे. दरम्यान कामबंद झाल्यास नागपूर जिल्ह्यातील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका आहे.

दोन महिन्यापासून वेतन थकते

विदर्भातील विविध उपकेंद्रांवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम करणारे कंत्राटी कर्मचारी दिवस-रात्र जोखमीचे काम करतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. होळीच्या सणाच्या काळातही त्यांच्या खात्यात एकाही रुपयाची रक्कम जमा झालेली नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. या प्रश्नावर संघटनेने नुकतीच महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्या वेळी प्रशासनाने सात दिवसांच्या आत थकीत वेतन मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनानंतरही संबंधित कंत्राटदाराने वेतन जमा झाले नाही.

शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष मोहन शर्मा, संयुक्त सचिव पी. व्ही. नायडू, सचिन काळबांडे, नितीन शेंद्रे, समीर हांडे, सुशील ढेंगळे, समीर पठाण, संजय मोढोरिया, चंदू गायधने, घनश्याम चरोडे, रजनिकांत बनकर, कुलदीप शेवते, आशिष सोनेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कामगारांच्या मागण्या काय ?

कामगारांनी प्रशासनासमोर काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये दोन महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ जमा करणे, भविष्यात दर महिन्याच्या सात तारखेपूर्वी वेतन देण्याची लेखी हमी देणे तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 'क्रिस्टल' कंपनीचे कंत्राट रद्द करून तिला काळ्या यादीत टाकावे. या सगळ्या कामगांना महावितरणने स्थायी करावे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.