Pune
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी याविषयीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.मंत्री संजय शिरसाट यांच्यावर होणाऱ्या आरोपांची शृंखला खंडित झालेली नाही. सिडको, छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल, सामाजिक न्याय विभागातील निविदा प्रक्रियेनंतर आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्या खात्यात निधी वितरण, टेंडर प्रक्रिया व मंत्री कार्यालयातील काही अधिकारी अनियमितता व घोटाळा करत असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अविनाश जाधव यांनी आपल्या पत्रात संजय शिरसाट यांच्या कार्यालयातील खासगी सचिव भरत कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विभागात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागात अलीकडील काळात गंभीर अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः विविध योजनांमधील निधी वितरण प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृह व वसतिगृहाशी संबंधित कामांमध्ये ऑनलाईन निविदा प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामांचे वाटप करण्यात आले असल्याचे जाधव यांनी केला आहे.
Maharashtra Budget 2026 Analysis: वित्तीय तूट, कर्ज, व्याज सारेच वाढले
मंत्रालयातील अधिकारी मंत्री कार्यालयाचा वापर करून काही कामे देताना आमदार, लोकप्रतिनिधी व संबंधित व्यक्तींकडे टक्केवारीची मागणी करत आहेत. या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून, त्याची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची गरज आहे. सामाजिक न्याय विभागात सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना काम करत असल्याची तक्रारही आमच्याकडे आली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीची व अधिकारांची चौकशी करण्यात यावी. या सर्व प्रकरणामुळे सामाजिक न्याय विभागातील प्रशासन व निधी वितरण प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परिणामी, या संपूर्ण प्रकाराची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.