आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची सरशी; कळंबमध्ये 'ईश्वरचिठ्ठी'ने दिली महायुतीला साथ
धाराशिव : जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिवसह तुळजापूर आणि कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत तिन्ही ठिकाणी विजय मिळवला असून, या विजयामुळे जिल्ह्यात आमदार पाटील यांची पकड अधिक घट्ट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कळंब पंचायत समितीची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली. येथे महायुती आणि महाविकास आघाडीचे संख्याबळ समसमान (टाय) झाल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंनी सभापती आणि उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. अखेर निवडणूक नियमानुसार ईश्वरचिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या नशिबाच्या खेळातही महायुती सरस ठरली आणि दोन्ही पदे महायुतीच्या झोळीत पडली. केवळ धाराशिव, कळंब आणि तुळजापूरच नव्हे, तर उमरगा आणि लोहारा पंचायत समितीवरही महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवत आपला झेंडा फडकवला आहे.
तुळजापूरमध्ये कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेत महायुतीच्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आहे. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींनी जनसेवेला प्राधान्य देऊन तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून ठिकठिकाणी गुलाल उधळून जल्लोष करण्यात येत आहे.