PUNE
अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या घटनेला आता काही आठवडे उलटले आहेत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता युगेंद्र पवार यांनीही अजित पवारांच्या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. अजित दादांचा विमान अपघात ही दुर्घटना नसून घातपात आहे, अशी शक्यता युगेंद्र पवार यांनी वर्तवली आहे.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी १० फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या दोन स्वतंत्र पत्रकार परिषदांमध्ये तांत्रिक पुराव्यांसह काही प्रश्न उपस्थित केले होते. रोहित पवारांनी विमानाचा मार्ग, वेग आणि तांत्रिक स्थिती दर्शवणारे एक प्रेझेन्टेशन सादर केले. विमान कोसळण्यापूर्वी त्यात काही तांत्रिक बिघाड झाला होता की तो जाणीवपूर्वक घडवून आणला होता? याबाबत त्यांनी यंत्रणेला धारेवर धरले आहे.
विमानाचा फक्त मागचा भाग दिसत होता
त्यानंतर आता युगेंद्र पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित दादांच्या विमान अपघाताबद्दल भाष्य केले. मला २८ जानेवारीला सकाळी ८:५५ वाजता फोन आला की दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे. मला सुरुवातीला वाटले की कदाचित रनवेवरून विमान घसरले असेल किंवा साधे क्रॅश लँडिंग झाले असेल. पण जेव्हा मी तातडीने बारामती विमानतळावर पोहोचलो, तेव्हा चित्र भयावह होते. विमान ५० फूट खाली कोसळले होते आणि पूर्णपणे खाक झाले होते. विमानाचा फक्त मागचा भाग (Tail) दिसत होता, बाकी सर्व काही जळून खाक झाले होते, असे युगेंद्र पवार म्हणाले.