आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

RTE Admission : 'आरटीई' कोट्याचा लाभ घरापासून १ किमी परिसरातील शाळांतच नवा निर्णय.

शिंदे राम   257   13-02-2026 18:09:49

Pune news 

RTE Admission : 'आरटीई' कोट्याचा लाभ घरापासून १ किमी परिसरातील शाळांतच. शिक्षण विभागाचा नवा निर्णय.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित कार्यपद्धतीनुसार, ऑनलाइन अर्ज करताना पालकांना त्यांनी नोंदविलेल्या निवासस्थानाच्या एक किलोमीटर परिसरातील शाळाच दिसणार आहेत.

त्याचप्रमाणे, प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरतानाच आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. 'आरटीई'च्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत कालानुरूप सुधारणा करण्यासाठी, तसेच नवीन नियम, आवश्यक बाबींचा समावेश करून शासनाला शिफारस करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारी २०२५ रोजी समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यावर नागरिकांचे अभिप्रायही विचारात घेण्यात आले. त्यानंतर समितीच्या शिफारशींनुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली.

आतापर्यंत पालकांना ऑनलाइन अर्ज करताना शाळा निवडण्याची, कागदपत्रे प्रवेशावेळी सादर करण्याची मुभा होती. मात्र, सुधारित कार्यपद्धतीनुसार, प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना कमाल १० शाळांचे पर्याय देता येतील. त्यासाठी संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या नोंदविलेल्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातीलच शाळा दर्शवल्या जातील. ऑनलाइन सोडत काढताना एक किलोमीटर आणि त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळांसाठी २५ टक्क्यांतर्गत एका शाळेत उपलब्ध असलेल्या प्रवेशाच्या रिक्त जागांपेक्षा जास्त पालकांकडून अर्ज प्राप्त झाल्यास प्रवेशाच्या पहिल्या फेरीतच त्या शाळेची सोडत प्रक्रिया पूर्ण होईल. सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकाच शाळेचे वाटप होईल.

प्रवेशासाठी अर्ज भरतानाच आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. प्रवेशावेळी पालकांनी दाखविलेला पत्ता आणि 'आधार' ओळखपत्रावरील पत्ता एकच असल्याची तपासणी करावी. पत्ताबदल दिसल्यास प्रत्यक्ष तपासणी करावी. शाळेने विद्यार्थ्याला प्रवेश दिल्यास किंवा प्रवेश नाकारल्यास त्याबाबतची पावती पालकांना द्यावी. त्याबाबत शासनाला दिसण्याची व्यवस्था प्रणालीमध्ये असावी, अशा सूचना आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.