पुणे : पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अश्विनी स्वरालयतर्फे 'नाट्य स्वर यज्ञ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात २२ संगीत नाटकातील तब्बल १०१ नाट्यगीते रसिकांना ऐकावयास मिळणार आहेत, अशी माहिती अश्विनी स्वरालयाच्या संचालिका, गुरू अश्विनी गोखले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ज्येष्ठ गायिका अभिनेत्री वर्षा जोगळेकर उपस्थित होत्या.
अश्विनी स्वरालयातर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर केले जातात, पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांना मानवंदना देण्यासाठी शिष्य या नात्याने 'नाट्य स्वर यन' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७:३० या वेळात नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. अश्विनी गोखले यांच्यासह निनाद जाधव, धनश्री खरवंडीकर, संपदा थिटे, चिन्मय जोगळेकर तसेच स्वरालयातील ८ ते ८० वयोगटातील ६५ विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सहभाग असणार आहे. संजय गोगटे, हिमांशु जोशी (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे, केदार परांजपे (तबला), अश्विनी गोखले, कार्तिकी वझे (संवादिनी), वसंत देव (टाळ) साथसंगत करणार असून वर्षा जोगळेकर, अनुपमा कुलकर्णी यांचे निवेदन असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
प्रचलित-अप्रचलित नाट्यगीतांचा समावेश..
सौभद्र, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, सुवर्णतुला, कान्होपात्रा, एकच प्याला, शाकुंतल या प्रसिद्ध, प्रचलित संगीत नाटकांमधील 'बद जाऊ कुणाला', 'खरा तो प्रेमा', 'नरवर कृष्णा समान, 'वेड्या मना तळमळसी', 'सोहम हर डमरू बाजे...' अशा लोकप्रिय पदांबरोबरच अमृत सिद्धी, सावित्री, पटवर्धन, द्रौपदी, अवघी दुमदुमली पंढरी, देवमाणूस, कालिदास या नाटकांमधील कचितच सादर होणारी 'आज मज सहज आला उल्हास', 'नच उरत सुख माधुरी', 'प्रभूवरा सांग ना', 'मजला घडावी देवा', 'हे माधवा मधुसूदना', 'चंडमुंड विनाशिनी', 'घेऊनिया हाती तुकयाची गाथा' ही नाट्यपदे ऐकावयास मिळणार आहेत.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रयत्न..
एका दिवसात शंभरपेक्षा अधिक नाट्यगीते यापूर्वी सादर झालेली नाहीत. अशा पद्धतीचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने या कार्यक्रमाची दखल घेतली असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होण्यासाठी प्रयत्न असल्याचे अश्विनी गोखले यांनी सांगितले.