मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अहिल्यानगर इथं पत्रकार परिषद घेत भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस हे मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावण्याचा डाव आखत असून, त्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असा घणाघाती आरोप मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे.
भाजपमधील (BJP)अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की त्यांना त्रास दिला जात आहे. आतापर्यंत मला 30-32 आमदार-खासदारांचे फोन आले आहेत", असा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे नेते आणि अधिकारी संपवण्याच्या कामाला लागले आहेत, असा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
प्रत्येक मंत्र्यांना फडणवीस यांनी स्वतःचे OSD दिले आहेत. भाजप वेगळा होता. पण फडणवीस यांनी पक्षाची दिशा बदलली आहे. सत्तेसाठी त्यांनी नारायण राणे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhepatil), अशोक चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांना पक्षात घेतले. एवढेच नव्हे तर भाजपमधीलच अनेक नेते संपवण्याचे कामही सुरू आहे', असा दावा देखील जरांगे पाटील यांनी केला.
'सत्तेसाठी आपल्या लोकांना लाथा मारण्याचं काम सुरू आहे, आणि माझ्याकडे त्याची यादीही आहे. जालना, सोलापूर आणि नांदेड इथंही अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आहे', असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. '"आमची परिस्थिती बिकट आहे" असे सांगणारे नेते दररोज संपर्क साधत आहेत', असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.