पंतप्रधान पीकविमा योजनेतील मागील वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई उद्या (सोमवार, ११ ऑगस्ट) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
यात खरीपातील नुकसानभरपाई ८०९ कोटी रुपये, तर रब्बीतील ११२ कोटी रुपये असा एकूण ९२१ कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे.
पहिल्यांदाच पीएम किसान धर्तीवर भरपाईचे वाटप
याआधी नुकसानभरपाई विमा कंपन्यांकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात होती. मात्र यावेळी पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर पहिल्यांदाच एकत्रित नुकसानभरपाईचे वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होईल आणि नंतर 'डीबीटी' (Direct Benefit Transfer) द्वारे रक्कम शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यांमध्ये जमा होईल.
भरपाईचे निकष कठोर
या हंगामातील नुकसानभरपाईचे निकष अधिक कठोर केल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भरपाई मिळाली आहे. राज्य सरकारचा विमा हप्ता रखडल्यामुळे काही दावे प्रलंबित होते. १३ जुलै रोजी राज्य सरकारने १,०२८ कोटी रुपयांचा हप्ता कंपन्यांकडे जमा केल्यानंतर भरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला.
या हंगामात ९५.६५ लाख अर्जदार शेतकऱ्यांना ४,३९७ कोटी रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी ८०.४० लाख शेतकऱ्यांना ३,५८८ कोटी रुपयांचे वाटप झाले. मात्र १५.२५ लाख शेतकऱ्यांना ८०९ कोटी रुपयांची भरपाई अद्याप मिळालेली नव्हती, जी आता मिळणार आहे.