मुंबई (Election Commission) देशातील 334 नोंदणीकृत पक्षाची मान्यता रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत.
मान्यता रद्द करण्याचं कारण काय?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मान्यता रद्द करण्यात आलेल्या पक्षांनी 2019 पासून कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. तसेच त्यांच्या पक्षांचे कार्यालय कार्यालयांचे ठिकाण प्रत्यक्ष तपासणीत आयोगाला आढळून आलेले नाही, त्यामुळे त्यांनी या पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन आयोगाकडून जारी करण्यात आलं आहं.
खरं तर नोंदणीकृत पक्ष म्हणून राहण्यासाठी संबंधित पक्षाला निवडणूक लढवणे ही मुख्य अट आहे. 334 पक्षांनी 2019 पासून लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुका यापैकी कोणत्याही निवडणुकीत सहभाग घेतला नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या पक्षांची मान्यता रद्द?
राज्यातील नऊ राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये आवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलान पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमॉक्रेटिक पार्टी, नवबहूजन समाज परिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डीयन, द लोक पार्टी ऑफ इंडिया, आणि युवा शक्ती संघटना या पक्षांचा समावेश आहे.