पिंपळे सौदागर येथील पी.के. चौक परिसर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी, अव्यवस्थित सिग्नलिंग आणि सतत घडणाऱ्या अपघातांच्या घटना यामुळे नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या ठिकाणी थेट पाहणी दौरा केला.
पिंपळे सौदागर येथील पी.के. चौक हा शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने व्यस्त ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी कामावर जाणाऱ्या व परत येणाऱ्या नागरिकांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते, तसेच हलक्या व जड वाहनांच्या संमिश्र प्रवाहामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी पी.के. चौक परिसराची सविस्तर पाहणी केली. त्यांनी स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि वाहतूक विभागाशी संवाद साधत प्रत्येक्ष अडचणी समजून घेतल्या.
शत्रुघ्न काटे यांनी स्पष्टपणे सांगितले की, पी.के. चौक परिसर हा संपूर्ण पिंपळे सौदागर, रहाटणी या भागांना जोडणारा मुख्य जंक्शन आहे. येथे शाळा, कार्यालये, सोसायट्या, हॉटेल्स, औद्योगिक वाहतूक यामुळे दिवसभर वाहतूक ताण असतो. त्यामुळे अनेक वेळा अपघात घडत आहेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.” या भागात केवळ सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग वा सामान्य सुधारणा पुरेशी ठरणार नाही. भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहतूक लक्षात घेता येथे ग्रेड सेपरेटर (उड्डाणपूल अथवा अंडरपास) उभारणे अत्यंत आवश्यक आहे.या उपायामुळे वाहतुकीचा सहज प्रवाह होईल आणि अपघात टळतील.
यासंदर्भात ते लवकरच महानगरपालिका आयुक्त, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगर रचना विभागाशी बैठक घेणार असून,ग्रेड सेपरेटरसाठी लागणाऱ्या निधी आणि तांत्रिक बाबींसंदर्भात प्रस्ताव तयार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पी.के.चौकात ट्रॅफिकची झपाट्याने वाढ, अपघात व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, शाळा, हॉस्पिटल, वसाहतींच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आणि यासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून ग्रेड सेपरेटर आवश्यक आहे. या भागातील नागरिकांनीही शत्रुघ्न काटे यांच्याकडे यासंदर्भात अनेक वेळा निवेदन दिले होते. या पाहणीवेळी इन्फ्राकिंग कंन्सल्टन्ट पतंगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.