मुंबई प्रतिनिधी:: धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब (ड्राय पोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल) उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी तांत्रिक, आर्थिक व लॉजिस्टिक दृष्टीने व्यवहार्यता तपासावी व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हब उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिलेले निर्देश -
✅ धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी तांत्रिक, आर्थिक आणि लॉजिस्टिक दृष्टिकोनातून व्यवहार्यता तपासून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कार्यवाहीस गती द्यावी.
✅ धुळे येथे उद्योगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
✅ देवपूर, वलवाडी आणि सखल भागांतील पावसाचे पाणी निचरा होईल, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधावा.
✅ शहराच्या विस्तारानुसार डीआय (डक्टाइल आयर्न) पाईपलाईन टाकणे, औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणे, तसेच भुयारी मलनि:स्सारण योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची प्रक्रिया तातडीने राबविणे.
✅ दरवर्षी पाणीपुरवठा आणि पथदिव्यांच्या वीज वापरासाठी महापालिकेवर ₹32 ते ₹33 कोटींचा खर्च होत आहे. हा खर्च कमी करण्यासाठी सौर प्रकल्प उभारण्याचे नियोजन करावे.
✅ शहराचा विस्तार 46.46 चौ. कि. मी. वरून 101.08 चौ. कि. मी. पर्यंत झाल्याने, वाढलेल्या हद्दीतील मूलभूत सोयींसाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा.
✅ चाळीसगाव रोडलगत म्हाडाच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारणे तसेच मौजे धुळे येथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गणेश नाईक, आमदार अनुप अग्रवाल आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.