मुंबई प्रतिनिधी :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह ज्या चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे त्यात एक नाव आहे केरळातील सी सदानंद मास्तर यांचं. ९० च्या दशकात केरळात जो प्रचंड हिंसाचार व्हायचा त्या हिंसाचारातून बचावलेले सदानंद मास्तर हे पक्षनिष्ठेचं आणि कर्तव्याचं एक जिवंत उदाहरण आहेत. सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांनी एका हिंसाचारात सदानंद मास्तरांचे दोन्ही पायच कापून टाकले. पण सीपीआयएमची दहशत असलेल्या राज्यात हार मानणारांपैकी ते नव्हते. सदानंद मास्तर लढत राहिले. ते भाजपचे सदस्य बनले. भाजपनेही २०२१ ला त्यांना तिकीट दिलं ते विधानसभेचं. मात्र त्यांचा पराभव झाला. अखेर त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पावती म्हणून राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर संधी देण्यात आली.
सदानंद मास्तर कोण आहेत?
सदानंद मास्तर हे मूळचे केरळ जिल्ह्यातील थिसुर जिल्ह्यातले आहेत. पेरामंगलममधील श्री दुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात १९९९ पासून त्यांनी सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. सदानंद मास्तरांनी गुवाहाटी विद्यापीठातून बी कॉम, तर कोलकाता विद्यापाठातून बीएडची पदवी घेतली. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामासोबतच ते केरळातील शिक्षक संघटनेचे उपाध्यक्षही आहेत.
केरळचा हिंसाचार आणि १९९४ ची घटना
सदानंद मास्तरांनी तरुण वयात ज्या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हती अशी घटना त्यांच्यासोबत घडली. सदानंद मास्तर कन्नूर जिल्ह्यातले आहेत. हा जिल्हा हिंसाचारासाठी ओळखला जायचा. सदानंद मास्तरांवर २५ जानेवारी १९९४ रोजी त्यांच्या घराजवळच हल्ला करण्यात आला. वयाच्या ३० व्या वर्षी सदानंद मास्तरांचे डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही पायच कापून टाकले. या घटनेतून सावरल्यानंतर सदानंद मास्तरांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात आणखी धैर्याने काम सुरू केलं.
राज्यसभेवर नियुक्ती कशामुळे?
शिक्षण, संस्कृती, कला, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल घटनेच्या कलम ८०(३) अंतर्गत राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर सदस्य नियुक्त केले जातात. सदानंद मास्तरांनी गेल्या तीन दशकात शिक्षण आणि सामाजिक जीवनात केलेल्या कामामुळे त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.
सदानंद मास्तर यांनी गेल्या तीन दशकात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केरळातील हिंसाचार थांबवण्यासाठी काम केलं. भाजपकडेही त्यांनी यासाठी अनेकदा मदत मागितली. केरळातील डाव्या पक्षाच्या हिंसाचारात अनेक भाजप कार्यकर्त्यांनी जीव गमावलाय आणि भीषण हल्ल्यातून वाचलेले सदानंद मास्तर हे एक आहेत.