Mumbai : मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने राज्य विमा हप्ता १ हजार २८ कोटी रूपये मंजूर केल्यामुळे आता विविध ट्रीगरखाली शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे.
तर यंदाच्या खरीप हंगामात या विमा योजनेमध्ये राज्य सरकारकडून मोठे फेरबदल करण्यात आले आहे. एक रूपयांत पीक विमा योजना यंदापासून शेतकऱ्यांना लागू होणार नाही.
खरीप हंगाम 2024 साठी आतापर्यंत 3907.43 कोटीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून यासाठीचे 3561.08 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. मात्र नुकसान भरपाई पोटी 346.36 कोटी प्रलंबित होते. कृषीमंत्री कोकाटे यांच्या सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत प्रशासकीय पातळीवर आढावा घेत याचा सदर प्रस्ताव वित्त विभागाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविला होता. या प्रस्तवास वित्त विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्य शासनाने राज्य विमा हप्त्याचे 1028.97 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे केंद्र सरकारच्या पिक विमा पोर्टलद्वारे सदर कार्यवाही पूर्ण होईल.
पीक कापणीत नुकसान दिसेलच
कृषिमंत्री कोकाटे यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, कोणत्याही टप्प्यात नुकसान झाले तरी शेवटी उत्पादकतेवर परिणाम होतो. पीक कापणी प्रयोगातून हे स्पष्ट होईलच. पीक कापणी प्रयोगातून उत्पादन कमी दिसले तर विमा भरपाई मिळणारच आहे. त्यामुळे विमा योजनेतून काढलेले ४ ट्रीगर लागू करता येणार नाहीत, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.