पुरंदर प्रतिनिधी :: पुणे जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते यांच्यासह उद्योजक प्रवीण माने, भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यातच आता पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचेही नाव चर्चेत आले आहे. तेही भाजपवासी होणार, अशी चर्चा सुरू झाली असून, कार्यकर्त्यांनीच थेट त्यांच्यावर पक्षबदलासाठी दबाव आणल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे तालुक्यात दोन मतप्रवाह झाले आहेत. यामध्ये काही जणांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घड्याळाला पसंती दिली आहे, तर काही जण कमळ हातात घेण्याची गळ घालत आहेत. त्यामुळे संजय जगताप यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गावबैठकांनी जोर धरला आहे.
भाजप प्रवेशाने तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ
पुरंदर तालुक्यात संजय जगताप आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रभाव मोठा आहे. जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर काँग्रेससाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. विजय शिवतारे यांना थेट शह देण्यास सक्षम नेते म्हणूनही संजय जगताप यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण करू शकतो.
भाजपची पुढील निवडणुकांसाठी तयारी
भाजप सध्या पुणे जिल्ह्यात आपली पकड वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. याअंतर्गतच संग्राम थोपटे यांना पक्षात घेतले गेले आणि आता संजय जगताप यांचाही पक्षप्रवेश भाजपसाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठा फायदा देऊ शकतो.