मुंबई प्रतिनिधी :- मराठी भाषा बोलण्याचा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धरला जात आहे. त्यावरुन मिरारोडमध्ये काही दिवसांपूर्वीच MNSच्या कार्यकर्त्यांनी एका अमराठी मिठाई व्यावसायिकाला चोप दिला.
केडियानॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांचं कार्यालय मुंबईतील वरळीत आहे. राज ठाकरेंना आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या केडिया यांचं कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आलेलं आहे. त्यांच्या कार्यालयावर मनसैनिकांनी जोरदार नारळफेक केली. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त मनसैनिकांनी पोलिसांना न जुमानता केडिया यांच्या कार्यालयावर हल्ला चढवला. यावेळी पोलिसांनी काही मनसैनिकांना ताब्यात घेतलं.
सुशील केडिया शेअर बाजार आणि गुंतवणूक तज्ज्ञ आहेत. २५ वर्षांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांसोबत काम करत आहेत. मार्केट टेक्निशियन्स असोसिएशनाच्या संचालक मंडळावर वर्णी लागलेले ते आशियातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी केडियानॉमिक्स नावाच्या रिसर्च फर्मची स्थापना केलेली आहे. शेअर बाजाराशी संबंधित सेवा देण्याचं काम ही कंपनी करते. सुशील केडिया अनेक बिझनेस चॅनेलवर पाहुणे म्हणून जातात. तिथे ते शेअर बाजार आणि गुंतवणूक विषयावर अधिकारवाणीनं बोलतात. मुंबईत राहणाऱ्या केडियांना हिंदी, इंग्रजीशिवाय बंगाली, गुजराती, मराठी भाषा अवगत आहे.