kolhapur shivsena:-
उपनेते संजय पवार यांच्यासह इतरांबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी मुंबईत 'मातोश्री'वर चर्चा केली. 'जिल्हाप्रमुखपदाचा निर्णय मी घेतलाय, तूर्त बदलणार नाही, दुरुस्ती करायची असेल तर करू, तुम्ही एकदिलाने सर्वजण काम करा,' असा सल्ला ठाकरे यांनी पवार यांच्यासह सर्वांना दिला.
जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड केल्यानंतर शिवसेनेत बंडाळी माजली. नूतन कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख हर्षल सुर्वे यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कोल्हापूर उत्तर, दक्षिण व करवीरसह जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी दबाव टाकला. मात्र, त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही. 1 जुलै रोजी पक्षप्रमुख ठाकरे यांनी पवार यांच्याशी संपर्क साधून मुंबईला बोलावले. त्यानुसार सुमारे 50 पेक्षा जास्त पदाधिकारी मुंबईला गेले होते.
'मातोश्री'वर दुपारी 3 च्या सुमारास सर्वजण पोहोचले. दुपारी 3.15 च्या सुमारास संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संजय पवार व विजय देवणे यांना ठाकरे यांच्या भेटीसाठी आत नेले. सुमारे पाऊण तास चौघांत चर्चा झाली. पवार यांनी ठाकरे यांना जिल्हाप्रमुखपद निवडीचा आपला निर्णय चुकल्याचे सांगितले. त्यावर ठाकरे यांनी आता मी निर्णय घेतला आहे. दुरुस्ती करायची असेल तर करू; पण थोडे थांबा, असे सांगितले. तसेच, पवार यांना उपनेतेपदाचा राजीनामा मागे घ्यावा, असे सांगितले. त्यानंतर ठाकरे यांनी बाहेर येऊन इतर पदाधिकार्यांनाही मार्गदर्शन केले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, महिला आघाडीच्या स्मिता सावंत, तालुकाप्रमुख विराज पाटील, तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील व सुरेश पवार, युवा सेनेचे मंजित माने यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.