Mumbai:- Bachchu Kadu
येत्या ६ जुलैला आषाढी एकादशी आहे. सर्व भाविक विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis हे या दिवशी काही तरी बोलले पाहिजेत, याची प्रतीक्षा करीत आहोत. किमान त्यांनी पांडुरंगाला तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य तारीख सांगितली पाहिजे, असा टोला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी लगावला आहे.
बच्चू कडू म्हणाले, योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. आता योग्य तारीख कोणती हे त्यांनी पांडुरंगाला तरी सांगावी, असे आमचे म्हणणे आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. ६ जुलैला मुख्यमंत्र्यांनी ती योग्य तारीख जाहीर करावी, अशी आमची विनंती आहे.
शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांच्या न्याय हक्कांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 'सातबारा कोरा करा' ही १३८ किलोमीटरची पदयात्रा ५ जुलै पासून सुरू होणार होती. पण, ६ जुलैच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा आता ७ जुलैपासून सुरू होणार आहे.