Latur (लातूर)
वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांना जाणीपूर्वक त्रास दिला जातो, किंवा पैशांची मागणी करत अडवणूक केली जात असल्याचे सातत्याने वाहनधारक बोलत असतात. अनेकदा वाहनधारक व वाहतूक पोलिसांमध्ये वाद झाल्याचंही पाहायला मिळतं.
लातूरमध्येही (Latur) असाच एक प्रकार समोर आला आहे. आपल्या स्कुटीवर बेफाम रस्त्याने निघालेल्या तीन तरुणीस महिला कॉन्स्टेबलने (Traffice) अडवून चांगलच झापलं आहे. विशेष म्हणजे संतप्त महिला वाहतूक पोलिसाने या मुलींना आधी बडवलं आणि नंतर सुनवलं देखील. लातूरातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral video) झाला असून मुलींच्या बेदरकारपणे वाहन चालवण्यावरुन नेटीझन्स कमेंट करत आहेत. जीव लई वर झाला का... रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? असा जाब विचारत महिला कॉन्स्टेबलने तीन तरुणीची भर रस्त्यावर तुफान शाब्दीक धुलाई केली. वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांचे नाव प्रणिता मुसणे असून त्यांचे हे वर्तन चुकीचं असल्याचंही काही नेटीझन्सकडून बोललं जात आहे.
लातूर शहरातील एका मुख्य रस्त्यावरुन तीन तरुणी स्कुटीवरुन बेफाम निघाल्या होत्या. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलला ही बाब लक्षात आली. त्यानंतर, बराच वेळ त्यांचा पाठलाग करून त्या तीन तरुणींना पोलिसांकडून अडवण्यात आलं. त्यानंतर वाहतूक शाखेतील महिला कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाला होता. त्या तीन तरुणी हाताला लागल्यानंतर महिला कॉन्स्टेबलने तिन्ही तरुणींना भर रस्त्यावरच चापटांचा प्रसाद दिला. त्यावरच हे प्रकरण संपलं असं झालं नाही. तर, गाडी कशी चालवता... कसं बसता... घरी सांगून आलात का... अपघात झाला, तुम्ही जर मेलात तर घरच्यांनी कोणाकडे पाहायचे... तुझ्या बापाचा नंबर दे, फोन लाव तुझ्या आईला... अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती या महिला कॉन्स्टेबलने सुरू केली होती. त्यावर, आमचं चुकलं म्हणून त्या तीन तरुणी गयावया करत होत्या. मात्र, वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांचा संताप काही केल्या कमी होत नव्हता. हा सर्व घटनाक्रम मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.