पुणे (Pune) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूरच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. नागनदीतील प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी नागपुरात व्हीएनआयटी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागांमध्ये उभारण्यात येणाऱ्या दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांबाबत मुंबईप्रमाणे व्हर्टिकल पद्धतीचा विचार करून जागेचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
या प्रस्तावित एसटीपी केंद्रांच्या जागांबाबत तातडीने टीसीएसमार्फत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. तसेच, नागपूर शहरातील पाणी टाक्यांमध्ये पुरेसा दाब नसल्यानं पाणीपुरवठा अडचणीत येतो आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थेला वेळेत टाक्या भराव्यात यासाठी पूर्वसूचना देऊनही उपाय न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा निर्देश मुख्यमंत्री यांनी दिला.
शहराच्या आगामी विकास आराखड्यासाठी नवीन डीपीआर तयार करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. यावेळी पोलिस विभागालाही यामध्ये सहभागी करून घ्यावे, शहरातील एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाअंतर्गत असलेले सीसीटीव्ही कॅमेरा तातडीने सुरू करणे आणि महापालिकेने केलेल्या विकासकामानंतर महावितरणमार्फत रस्त्यांचे खोदकाम केले जाते, मात्र काम झाल्यानंतर रस्त्यांचे योग्य रीतीने समतलीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके तसेच महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, एमएसआयडीसी, महावितरण, महामार्ग प्राधिकरणातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.