Pune matro
अखेर खडकी मेट्रो स्टेशन आजपासून प्रवाशांच्या सेवेत
पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील खडकी मेट्रो स्टेशन शनिवार (दि.21) पासून प्रवासी सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे खडकी बाजार, खडकी कॅन्टोमेंट, औंध, रेंजहिल्स आदी भागांसह संरक्षण विभागाच्या विविध आस्थापनेतील कर्मचारी व अधिकारी तसेच, विद्यार्थी, कामगार, व्यापारी व नागरिकांना मेट्रोने प्रवास करणे सुलभ होणार आहे.
पिंपरी ते जिल्हा न्यायालय अशी मेट्रो 1 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली आहे. मात्र, खडकी आणि रेंजहिल्स मेट्रो स्टेशन अद्याप कार्यान्वित झालेले नाही. प्रवाशांना बोपोडी ते शिवाजीनगर असा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे खडकी व रेंजहिल्स भागांतील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्या संदर्भात 'पुढारी'ने वारंवार छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले आहे. अखेर, खडकी मेट्रो स्टेशन प्रवासासाठी खुले होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हे स्टेशन खडकी रेल्वे स्टेशनला लागून आहे. या मेट्रो स्टेशनवरून प्रवाशांना थेट खडकी रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे नागरिकांना मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचा लाभ घेता येणार आहे.
हे स्टेशन सुरू झाल्यामुळे प्रवाशांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंजहिल्स, औंध रस्ता, ऑर्डनन्स फॅक्टरी रुग्णालय, मुळा रोड अशा महत्त्वाच्या ठिकाणी पोहचणे सोयीस्कर होणार आहे. मात्र, रेंजहिल्स स्टेशनचे काम बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खडकी ते शिवाजीनगर असा प्रवास करावा लागणार आहे.