आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 रायगड

२५ माजी नगरसेवक समर्थकांसह; अजित गव्हाणे स्वगृही परतण्याच्या वाटेवर?

शरद लाटे  137   13-06-2025 09:11:21

पुणे (Pcmctahalka.in) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश केलेले भोसरीचे अजित गव्हाणे हे २५ माजी नगरसेवक समर्थकांसह पुन्हा स्वगृही परतण्याच्या वाटेवर आहेत.

गव्हाणे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे गव्हाणे लवकरच समर्थकांसह राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गव्हाणे हे स्वगृही परतणार असल्याने शरद पवार गटाला हा धक्का मानला जात आहे.

 

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील संघटना, आमदार, सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचा पराभव झाल्याने आणि भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणूकही लढविली. पण, अपयश आले. पराभवानंतर गव्हाणे यांनी शांत राहण्याची भूमिका घेतली. मध्यंतरी शिवसेना (शिंदे) पक्षाने गव्हाणे यांना प्रवेशासाठी गळ घातली. महामंडळ देण्याचा शब्द दिला. पण, गव्हाणे यांची विधान परिषद देण्याची मागणी होती. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्याशी थेट संपर्क आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे गव्हाणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही.

 

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे पुन्हा गव्हाणे यांनी शांत राहण्याची भूमिका घेतली. मात्र, पक्षाच्या वर्धापनदिनी एकत्र येण्याबाबत कोणतीही स्पष्टता आली नाही. त्यातच महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश आले. त्यामुळे गव्हाणे यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट घेतली. महापालिका निवडणुकीतील बेरेजेच्या राजकारणासाठी पवार हे देखील गव्हाणे यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी अनुकूल आहेत. विधानसभा निवडणुकीनंतरही पवार यांनी गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे गव्हाणे हे लवकरच समर्थकांसह पुन्हा स्वगृही म्हणजेच अजित पवार यांच्या 'राष्ट्रवादी'त प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.