मुंबई प्रतिनिधी (Pcmctahalka.in) :: दिल्लीकरांना अखेर नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. दिल्लीतील भाजप आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता दिल्लीची कमान महिला सांभाळणार आहे. नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश शर्मा यांचं नाव उपमुखमंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे.
भाजपने त्यांच्या एक्स हँडलवर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतची माहिती देत रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. भाजपाने पोस्ट करत म्हटले की, 'दिल्ली भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.'
रेखा गुप्ता यंदाच्या निवडणुकीत दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा २९५९५ मतांनी पराभव केला आहे.
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील २७ वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता. काँग्रेस आणि आप यांच्यात न झालेल्या युतीचा भाजपाला फायदा होईल असे मानले जात होते. ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालांनतर दिल्लीची सत्ता भाजपाकडे जाणार, याचे चित्र स्पष्ट झाले होते. दिल्लीत भारतीय जनता पक्षाने ४८ तर आम आदमी पक्षाने २२ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला यंदा सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही.